पनवेल।
कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पांतर्गत मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीला गती देण्यासाठी पनवेल महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाने मंगळवारी मोठी संयुक्त कारवाई करत एमजीएम रुग्णालयासमोरील सर्व अतिक्रमणे हटवली. या धडक मोहिमेमुळे अनेक वर्षांपासून अडथळा ठरत असलेला महत्त्वाचा कॉरिडॉर अखेर मोकळा झाला असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एमजीएम रुग्णालयासमोरील परिसरात वर्षानुवर्षे पक्की आणि तात्पुरती अतिक्रमणे उभारली गेली होती. त्यामुळे या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत होती आणि रुग्णालयात येणाऱ्या रुग्णवाहिकांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत होता. या समस्येची दखल घेत प्रशासनाने कठोर भूमिका घेत व्यापक तोडक कारवाई हाती घेतली.
या कारवाईदरम्यान जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या साहाय्याने सर्व अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच महानगरपालिका, सिडको आणि पोलीस प्रशासनाचे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ या मोहिमेत सहभागी झाले होते.
ही कारवाई आयुक्त मंगेश चितळे आणि अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी सहायक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी डॉ. रूपाली माने, अधिक्षक दशरथ भंडारी, उमेश मडवी, सिडको अधिकारी रावसाहेब देवकर आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी भविष्यातही अशाच प्रकारच्या कठोर कारवाया सुरू राहतील. या मोहिमेमुळे कळंबोली परिसरातील वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
