भाजपचे तब्बल दोन डझन नगरसेवक संपर्कात असल्याची चर्चा
नवी मुंबई। राज्य आणि केंद्रात भाजप-शिवसेना सत्तेची गाडी एकत्र धावत असली, तरी नवी मुंबई महानगरपालिकेत मात्र याच महायुतीतील घटक आमनेसामने उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे. शहराच्या राजकारणात आता प्रश्न विकासकामांचा कमी आणि सत्तेची चावी नेमकी कोणाच्या हातात राहणार, याचा अधिक असल्याची चर्चा रंगली आहे.ह्या संदर्भात विस्तृत माहिती स्वतंत्र भारत डॉट कॉम च्या हाथी लागली आहे.
नवी मुंबईचे कद्दावर नेते गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाढत्या राजकीय मतभेदांची धग आता थेट मनपाच्या सत्ताकारणापर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सत्ताधारी भाजपमध्येच नाराजी वाढत असून भाजपचे जवळपास दोन डझन नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचा दावा स्वतंत्र भारत डॉट कॉमच्या प्रतिनिधीसी बोलताना केला जात आहे.
कोट्यवधी खर्च करून निवडून आले, आता कामांसाठी वणवण?
सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक भाजप नगरसेवक आपल्या प्रभागातील विकासकामे अपेक्षित वेगाने होत नसल्याने नाराज आहेत. निवडणुकीत मोठा खर्च करून सभागृहात पोहोचल्यानंतरही आपल्या मतदारसंघातील कामांना गती मिळत नसल्याची त्यांची कथित खदखद आहे.दुसरीकडे, शिवसेनेच्या नगरसेवकांच्या कामांनाही राजकीय संघर्षातून अडथळे आणले जात असल्याची चर्चा आहे.सत्ता एका बाजूला, नाराजी दुसऱ्या बाजूला आणि विकासकामे मात्र मध्येच अडकली!
मनपात भाजपची ‘मनमानी’ की सत्तेचा संघर्ष?
सत्ताधारी भाजपकडून मनपा प्रशासनात मनमानी पद्धतीने निर्णय घेतले जात असल्याचे आरोप होत असतानाच अधिकाऱ्यांशी संबंधित काही निर्णयांनीही राजकीय संघर्षाला हवा मिळाल्याची चर्चा आहे.
विधी अधिकारी अभय जाधव यांच्याविरोधातील प्रस्ताव तसेच नगररचना विभागाचे उपायुक्त सोमनाथ केकाण यांना मंत्रालयात परत पाठवून चौकशी करण्याचा प्रस्ताव यावरूनही राजकीय वातावरण तापल्याची चर्चा आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, नगरविकास विभाग आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर या निर्णयांना ब्रेक लागल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नवी मुंबई मनपातील भाजपच्या कथित मनमानीला शिंदे गटाकडून लावण्यात आलेला हा पहिला मोठा राजकीय लगाम असल्याचे मानले जात आहे.
बंद दाराआड बैठक... बाहेर मात्र राजकीय खळबळ!
या संपूर्ण घडामोडीत सर्वाधिक खळबळजनक दावा म्हणजे भाजपमधील नाराज असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या जवळपास दोन डझन नगरसेवकांची नुकतीच गुप्त बैठक झाल्याची चर्चा.या बैठकीची कुणालाही भनक लागू नये, याची काळजी घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या बैठकीचे नेतृत्व भाजपमधीलच एका ज्येष्ठ नगरसेवकाने केल्याची माहिती समोर येत आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, आधी या गटाला पूर्णपणे मजबूत करण्यात येणार असून योग्य वेळ साधून या नगरसेवकांना शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश देण्याची राजकीय रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे.
महापौरपदावरही डोळा?
राजकीय वर्तुळातील चर्चांना आता आणखी वेग आला आहे. या संभाव्य गटाचे नेतृत्व करणाऱ्या ज्येष्ठ नगरसेवकाला भविष्यात महापौरपदाची खुर्ची देण्याचा राजकीय फॉर्म्युला तयार केला जात असल्याची चर्चा आहे.
तर या नगरसेवकांना शिवसेनेत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या शिवसेनेच्या एका नगरसेवकाला स्थायी समिती सभापतीपद देण्यावरही जोर असल्याची चर्चा आहे.हा राजकीय फॉर्म्युला प्रत्यक्षात उतरला, तर नवी मुंबई मनपातील सत्तेचे संपूर्ण गणितच उलटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘दादा’ंसमोर सर्वात मोठे आव्हान?
आता खरी कसोटी आहे ती गणेश नाईक यांच्या राजकीय प्रभावाची.‘दादा’ आपल्या नगरसेवकांना एकजूट ठेवण्यात यशस्वी ठरणार का?की नाराज नगरसेवक पक्षाच्या आदेशांना बगल देत शिंदे सेनेचा भगवा हाती घेणार?आणि जर भाजपमधूनच मोठ्या संख्येने नगरसेवक बाहेर पडले, तर त्याचा धक्का केवळ मनपाच्या सत्तेला बसणार की नवी मुंबईच्या संपूर्ण राजकीय समीकरणालाच हादरा बसणार?
सध्या हे सर्व दावे राजकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असून त्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. मात्र नवी मुंबईत पडद्यामागील बैठका आणि राजकीय संपर्कांच्या चर्चांना उधाण आले असल्याने पुढील दोन-तीन महिने नवी मुंबईच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.आता प्रश्न केवळ नगरसेवकांच्या पक्षबदलाचा नाही...प्रश्न आहे—नवी मुंबई मनपाच्या सत्तेची चावी अखेर कोणाच्या हातात जाणार?
