मुलाने ६५ वर्षीय आईचा गळा आवळून केला खून; संतापाच्या भरात डोके फरशीवर आपटल्याचा आरोप
शीतल वाघमारे
नवी मुंबई ।वाशी सेक्टर-११ येथील अष्टविनायक सोसायटीमध्ये खळबळजनक हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. ४२ वर्षीय मुलाने कथितरित्या आपल्या ६५ वर्षीय आईचा गळा आवळून खून केल्याचा आरोप आहे. त्यानंतर संतापाच्या भरात तिचे डोके फरशीवर आपटल्याचेही पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
पोलिसांच्या नोंदीनुसार, नंदा रळकर कदम (६५) यांची हत्या त्यांचा मुलगा महेश रळकर कदम (४२) याने केल्याचा आरोप आहे. दोघेही वाशी सेक्टर-११ येथील अष्टविनायक सोसायटीमध्ये राहत होते.
आईच्या वागण्यावरून मुलाच्या मनात होता राग
प्राथमिक तपासानुसार, आरोपी आपल्या आईच्या वागण्यामुळे नाराज होता. आई आपल्या पत्नीला योग्य महत्त्व देत नसून केवळ मुलीची बाजू घेत असल्याचा आरोपीचा आरोप होता. याच कारणावरून त्याच्या मनात आईबद्दल मोठा राग निर्माण झाला होता.
९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९.५० वाजण्याच्या दरम्यान घरात वाद झाला. यावेळी संतापाच्या भरात आरोपीने आईचा गळा आवळला आणि त्यानंतर तिचे डोके फरशीवर आपटल्याचा आरोप आहे. या घटनेत नंदा कदम यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर १० ऑगस्ट रोजी पहाटे ३.३४ वाजता वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही वेळात कारवाई करत पहाटे ४.५० वाजता आरोपी महेश कदम याला अटक केली.
या प्रकरणी BNS कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.आई-मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेमुळे वाशी परिसरात खळबळ उडाली आहे.
