थकबाकीच्या नावाखाली मीटर पळवले; MSEB कॉन्ट्रॅक्टर/ अधिकाऱ्यांवर चोरीचा गुन्हा का दाखल करू नये?
ऐरोलीतील संतप्त नागरिकांचा सवाल; कंत्राटदारांच्या मनमानीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
नवी मुंबई (प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) ऐरोली सेक्टर १५ विभागातील कारभार सध्या पूर्णपणे रसातळाला गेला असून, येथील अधिकारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुजोरीमुळे सामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. थकबाकी वसुलीच्या नावाखाली ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना न देता, घराबाहेरील मीटर चोरट्या मार्गाने काढून नेण्याचे सत्र सुरू आहे. "ग्राहकाला माहिती न देता मीटर चोरून नेणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांवर आणि कंत्राटदारांवर चोरीचा गुन्हा का दाखल करू नये?" असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.
नेमकी तक्रार काय?
नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल बबन बांगर यांनी महावितरणच्या या तालिबानी कारभारावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांच्याकडे ऐरोलीतील अनेक रहिवाशांनी तक्रारी केल्या आहेत की, कंत्राटदाराचे कर्मचारी मीटर रूममध्ये घुसून कोणालाही न सांगता मीटर तोडून नेतात.
"ज्या व्यक्तीच्या नावावर मीटर आहे, त्या घरामध्ये किंवा दुकानात कळवल्याशिवाय मीटर काढू नये हा नियम आहे. मात्र, ऐरोलीत नियमांना धाब्यावर बसवून दादागिरी केली जात आहे. जर ग्राहकाने जागेवरच थकीत बिल भरण्याची तयारी दाखवली , बिल भरले, तरीही मीटर दिले जात नाही. ही एक प्रकारे दादागिरी लूट असून, नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन आहे," असे बांगर यांनी म्हटले आहे.
मुख्य समस्या आणि ग्राहकांचे आरोप:
'चोरीचा गुन्हा' दाखल करण्याची मागणी: विनापरवाना आणि कोणालाही न सांगता खासगी जागेतून मीटर काढून नेणे ही चोरीच आहे, अशी भावना ग्राहकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी रहिवाशांनी दर्शवली आहे.
बिलांच्या वाटपात भ्रष्टाचार: MSEB ने नेमलेले कंत्राटदार लोक प्रत्येक घरापर्यंत बिल पोहोचवत नाहीत. सोसायट्यांच्या कोपऱ्यात बिलांचे ढीग फेकून दिले जातात. बिल हातात न पडल्यामुळे ग्राहकांकडे थकबाकी राहते आणि याचाच फायदा घेऊन मीटर जप्तीची 'टार्गेट' पूर्ण केली जातात.
पोलिस स्टेशनचा धाक: जेव्हा एखादा जागरूक ग्राहक नियमांची विचारणा करतो, तेव्हा महावितरणचे कर्मचारी त्यांना सहकार्य करण्याऐवजी उलट पोलिसांचा कायद्याचा खोटा धाक दाखवून आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. लोकप्रतिनिधींनाही फाट्यावर मारून दबंग गिरी चालू आहे.
संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता
ऐरोली सेक्टर १५ मध्ये महावितरणच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारींचा डोंगर साचला आहे. एखादे मीटर काढल्यानंतर थकबाकी भरूनही तेच मीटर परत न देता, नवीन मीटर घेण्यासाठी ग्राहकांना एम.एस.ई.बी. कार्यालयात चकरा मारायला लावल्या जातात. या त्रासामुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट असून, महावितरणचे अधिकारी आणि नागरिक यांच्यात कोणत्याही क्षणी मारामारी किंवा हिंसक बाचाबाची होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
या संदर्भात आता नागरिक ऊर्जामंत्री, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे तीव्र शब्दांत तक्रार करणार आहेत. या अन्यायाची दखल न घेतल्यास वेगळ्या स्टईल ने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विठ्ठल बांगर यांनी दिला आहे.
